Sharad Pawar  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. अनकेदा जुन्या पक्षातील म्हणजेच एकत्र असतानाच्या काही आठवणी किंवा घडलेल्या घटनांवरूनही भाष्य केलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी 2019 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं, असं वक्तव्य केलं. तटकरेंच्या या वक्तव्यावर आता आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत असतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले. दरम्यान, सुनील तटकरे यांनी 2019 साली निवडून आलेल्या विधानसभेच्या जागांचा संदर्भ देत मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवं होतं. 


शिवसेनेच्या 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 56 जागा विधानसभेला निवडून आल्या होत्या. त्यामुळे, पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळायला हवं होतं, असं माझं आणि काही सहकाऱ्यांचं मत होतं, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला. त्यावर, आता आमदार रोहित पवारांनी पदापेक्षा महाराष्ट्राच्या लोकांसाठी शरद पवार लढत असतात, असे म्हटले आहे. शरद पवार आणि महाविकास आघाडीचा 2019 ला मुख्यमंत्री पदासाठीचा निर्णय झाला होता. आपण पदासाठी लढत नसतो, विचारांसाठी लढतो. शरद पवार हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत असतात, त्यांनी कधी पदासाठी विचार केला नाही, तटकरे बोलत आहे ते पदासाठी बोलत आहेत, त्यांची इच्छा होती की त्यांच्यातला एक नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे म्हणत रोहित पवारांनी सुनील तटकरेंना लक्ष्य केलं. तसेच, नाव न घेता अजित पवारांना मुख्यमंत्री करावं, अशी त्यांची इच्छा होती, असेही सूचवले. 


सरकारची सोडा, पोलिसांची भूमिका समजून घ्या


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यामध्ये तुम्ही पैसा खाल्ला हा आमचा आक्षेप आहे. कर्नाटकात दोन गटांमध्ये राडा झाला, त्यामध्ये काही लोकांच्या गणेश मूर्ती होत्या, या गोंधळात ती मूर्ती पडू नये. मूर्तीला कुठे इजा जाऊ नये, यासाठी तेथील पोलिसांनी सर्वात सुरक्षित जागा म्हणून पोलीस व्हॅनमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवली. सरकारची भूमिका सोडा पण पोलिसांची भूमिका तुम्ही समजून घ्या, असे म्हणत कर्नाटकमधील गणपती बाप्पांच्या मूर्तीप्रकरणावर रोहित पवारांनी भाष्य केलंय. आता याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करत असाल, तुम्ही फक्त राजकीय भूमिका घेता आणि आम्ही भूमिका घेत असताना  सामाजिक भूमिका घेतो, असेही त्यांनी म्हटले. 


महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष


महायुतीत जागावाटपापूर्वीच तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, अशा शब्दात महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे यांनी पलटवार केला आहे. महायुतीमध्ये राज्यातील काही मतदारसंघावरुन घमासान होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, अनेक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर, काही ठिकाणी भाजप पदाधिकारी व इच्छुकांकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे, महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष अटळ असल्याच दिसून येते. 


हेही वाचा


मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल