मुंबई : पुण्यात एसटीखाली 9 जणांना चिरडल्याप्रकरणी दोषी संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. संतोष मानेला यापूर्वी उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते.


पुण्यातील सनकी ड्रायव्हर संतोष माने याला सत्र न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानंही कायम ठेवली होती. आरोपीची शिक्षा कमी झाली तरीही त्याची सुधारण्याची काही शक्यता नाही, असा निष्कर्ष लावत हा निकाल दिला होता.

मात्र संतोष मानेच्या वकिलांनी कोर्टात दावा केला होता की संतोष हा मनोरुग्ण असून त्याच्या मागे त्याचा परिवार आहे ज्यात बायको, आई वडील आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं.  सर्वोच्च न्यायालयाने संतोष मानेला दिलासा देताना त्याची फाशीची शिक्षा रद्द करताना त्याचं रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं आहे.

संतोष माने हा मुळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा आहे. ड्रायव्हर म्हणून 13 वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. 25 जानेवारी 2012 रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली होती. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्यानं 9 जणांना चिरडलं होतं, तर 37 जण जखमी झाले होते.

शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि अतिहिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं होतं.