बुलढाणा : एका विशीतील तरुणीचा विवाह होतो. विवाहानंतर आपल्या पतीशी आणि सासरच्यांशी विचार न जुळल्याने काही दिवसातच या युवतीचा घटस्फोट होतो. युवती पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या घरी राहायला येते. काही दिवसांनी तिचं गावातील आपल्याच नात्यातील तरुणाशी प्रेमसंबंध जुळतात. या नात्यातून सुंदर बाळाचा जन्म होतो. पण बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने ही तरुणी बाळाला कचऱ्यात फेकून देते. बेवारस बाळाचे गल्लीतील श्वान लचके तोडतात. कुणाचं तरी लक्ष गेल्यावर या बाळाला उचलून दवाखान्यात दाखल केलं जातं आणि सुरु होतो संघर्ष. चित्रपटाला शोभेल अशी कहाणी बुलढाण्यातील तरुणीची. पण या कहाणीत शिवसेना आमदार संजय गायकवाड हिरोची भूमिका निभावतात, तरुणीचा पुनर्विवाह करुन शेवट गोड करतात. मग सगळं हॅप्पीली एव्हर आफ्टर...


बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील उषा शिंगने या मुलीचा विवाह भुसावळ येथील नात्यातील मुलासोबत झाला होता. मात्र त्यांचे एकमेकांशी पटले नाही म्हणून तिचा संसार सुरु होण्यापूर्वीच संपुष्टात आला. ती माहेरी डोंगरखंडाळा येथे आई-वडिलांसोबत राहत होती. त्याच दरम्यान तिचा आतेभाऊ विनोद पट्ठे हा तिच्या घरी नेहमीच यायचा. यातच त्यांचे सूत जुळले आणि शरीरसंबध आले. उषा गर्भवती झाली तेव्हा विनोदने तिला नाकारले. आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्याचं तो विसरला. उषाच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर काढलं. ती अशीच इकडेतिकडे वेड्यासारखी भटकत होती. तिने नऊ महिन्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला, पण ते बाळ नकोसे झाले होते. बाळाला जन्म देताच तिने ते त्याला एका नाल्यात फेकून दिलं. तेव्हा काही भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. तिथे बाळ असल्याचं कोणाच्यातरी लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. बाल संगोपन अधिकारी अॅड. किरण राठोड यांनी त्या बाळाचे पूर्ण संरक्षण करुन रुग्णालयात उपचार केले. दुसरीकडे बाळाच्या आईचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. बाळाच्या आईने मायेचा पाझर फुटून ते बाळ आपलंच असल्याचा दावा तिने केला. सर्व तपासणी आणि चौकशी केल्यानंतर बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आलं. पण संघर्ष इथेच संपला नाही. तेव्हापासून ते बाळ घेऊन ती आई बुलढाणा शहरातील चौकाचौकात भीक मागत फिरत होती.



शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी या घटनेची दखल घेतली आणि उषाच्या आतेभावाला बोलावून समजावून सांगितलं. त्याने उषाला स्वीकारण्यास संमती दिली. आमदार संजय गायकवाड यांनी काल (17 डिसेंबर) स्वतःच्या शिवसेना संपर्क कार्यलयात हिंदू पद्धतीने त्यांचं विधिवत लग्न लावलं. सोबतच बाळाचं स्वराज असं नामकरणही करण्यात आलं. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.


शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या या सामाजिक कार्याचे जिल्हाभरात कौतुक केलं जात आहे. अखेर उषाला पती आणि बाळाला पिता मिळाला होता. आमदार गायकवाड यांनी पुढाकार घेतला नसता तर कदाचित या युवतीचं आणि तिच्या बाळाचं भविष्य काय असतं हे कोणीच सांगू शकणार नाही.