Buldhana News बुलढाणा : शेगाव तहसील प्रशासनाचा निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका अवैध वीट भट्टी मालकाने चक्क राष्ट्रीय महामार्गावरील पुलच ताब्यात घेतला आहे. सोबतच अवैधरित्या हा महामार्ग देखील बंद पडला आहे. हैदराबाद - नांदेड - शेगाव - बुऱ्हानपूर - इंदोर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161-G वरील पूर्णा नदीवरील हा ब्रिटिशकालीन पूल आहे. प्रकरण इथवरच थांबले नाही, तर या अवैध वीट भट्टी मालकाने पूर्णा नदीच्या पात्रात अवैधरित्या खोदकाम करून पूर्णा नदीच पात्रही बदलण्याचा प्रयत्न केला आहे. इतका धक्कादायक प्रकार राजरोजपणे सुरू असताना मात्र शेगाव तहसीलदार आणि तहसील प्रशासन मात्र झोपेत आहे का, असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे.  


चक्क राष्ट्रीय महामार्गावरील पुलच घेतला ताब्यात


हैदराबाद - नांदेड - शेगाव - बुऱ्हानपूर - इंदोर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161-G वरील पूर्णा नदीवरील हा ब्रिटिशकालीन पूल आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या ही वीट भट्टी सुरू आहे. तर या वीट भट्टी मालकाची हिम्मत इतकी वाढली आहे की त्याने चक्क ब्रिटिशकालीन पूल ताब्यात घेऊन त्याचा वापर अवैधरित्या उत्खनन करण्यासाठी केलाय. सोबतच पूर्णा नदीचे पात्र बदलून माती वाहतूक करणे असा हा प्रकार राजरोसपणे  सुरू आहे. मात्र असे असताना यावर जिल्हाधिकारी आणि  विभागीय आयुक्त अद्याप मौन धरून आहेत. इतका गंभीर आणि धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू असतानाही तहसील प्रशासन काय करत आहेत ? यामुळे एखादी दुर्घटना घडली किंवा पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झालं तर याला जबाबदार कोण ? असा सवाल आता परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित करत आहे.


नदीचे पात्र बदलण्याचाही प्रयत्न 


धक्कादायक बाब म्हणजे पूर्णा नदी पात्रात अवैधरित्या खनन करून नदीचे पात्र बदलण्याचा प्रकारही  येथे झाला आहे. मात्र यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण? प्रशासनाला नेमकी कधी जाग येईल, असा रोष आता स्थानिकांमधून उमटतांना दिसत आहे. परिणामी,  प्रशासनानं याबाबत तात्काळ पाऊल उचलत अवैध वीट भट्टी मालकाविरोधात कारवाई करून हा प्रकार बंद पाडावा, अशी मागणी आता स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या