मुंबई : एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना दुसरीकडे राज्यासह देशातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. देशात पुढील 48 तासात कोकणात आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे.


मान्सूनची चाहूल 


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे.


मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट 


मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात आणि ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला असून उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय, सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूरमध्येही उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस हा उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उन्हाचा कडाका


पुढील 48 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अशंतः ढगाळ वातावरण, तर दुपारी आणि संध्याकाळी निरभ्र आकाश राहील. मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.


या भागात पावसाची शक्यता 


याउलट कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.