बुलडाणा : अखेर अक्षय तृतीयेला भेंडवळ मांडणी करीत भाकित वर्तविले आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत 350 वर्षाची भेंडवळ भविष्यवाणी परंपरा अखंडित ठेवली आहे. भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी केवळ चौघांच्या उपस्थितीत करण्यात आली. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा पाऊस भरपूर होईल पण पीक परिस्थिती साधारण राहील, देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल. देशाचा राजा कायम राहील, मात्र त्याच्यावर ताण वाढेल असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवलं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बुलडाण्याच्या प्रसिद्ध भेंडवळ मधील घट मांडणी होणार नाही असे जाहिर करण्यात आले होते. मात्र ही 350 वर्षाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सारंगधर महाराज यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजासह चार लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली. आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण केले गेले. त्यानुसार यावर्षीचे भाकित वर्तविले गेले.

या भविष्यवाणीत यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात होईल, देशावर नैसर्गिक संकट ओढवेल, देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण वाढेल. संरक्षण व्यवस्था मजबूत जरी असली तरी शत्रूच्या कारवाया सुरुच राहतील, त्यामुळे सर्वांना सोबत राहून संकटाशी सामना करावा लागेल, असं भाकित वर्तवलं आहे.

काय आहे भेंडवळ घटमांडणीतलं भाकित
यावर्षी चारही महिन्यात पावसाळ सर्वसाधारण व चांगल्या स्वरुपात राहील. अतिवृष्टि होईल, त्यामुळं नासाडी सुद्धा होईल.

पृथ्वीवर नैसर्गिक व रोगराईचे संकट येईल. त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

राजा कायम राहील मात्र आर्थिक स्थिती खालावल्यामुळे राजा वर तणाव वाढेल.

परकीयांची घुसखोरी होईल संरक्षण खात्यावर ताण राहील, त्यामुळे त्रास होईल.

ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन सर्व पिकं चांगली येतील. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल. चारा टंचाई भासेल.

जामिनीतील पाण्याची पातळी वाढेल. पाऊस चांगला असल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल.