बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात आपल्या नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी परदेशातून आलेल्या पाहुण्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या 12 पैकी 3 पाहुण्यांवर खामगावच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 9 जणांना बुलडाण्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी मलेशियातील 5 आणि इंडोनेशियामधील 7 पाहुणे आपल्या नातेवाईकांकडे आले आहेत. त्यापैकी तीन जणांना तब्येत ठीक नसल्याने खामगाव येथे उपचारासाठी ठेवण्यात आले असून नऊ जणांना बुलडाणा येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या नऊ पाहुण्यांना चौदा दिवस निगराणी खाली ठेवण्यात येणार असून कोरोनाचे गांभीर्य पाहता सर्वोतोपरी खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे.

तो मृत वृद्ध कोरोना निगेटिव्ह
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात काल सायंकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास मृत्यू झालेल्या 70 वर्षीय वृद्धाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या वृद्धाला कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सौदी अरब इथून आलेल्या 70 वर्षीय रुग्णाला खोकला व श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. यामुळे ते आपल्या घरी न जाता ते खाजगी रुग्णालयात भरती झाले होते. तिथे कोरोनाचे लक्षण दिसल्यामुळे थेट बुलडाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाचे लक्षण आढळल्यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आले घेतले होत. ते नमुने नागपूर इथं पाठवण्यात आले होते.

कोरोनाने दोघांचा मृत्यू

भारतात कोरोनाची लागण झाल्याने आधी कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा आणि दिल्लीत एका वृद्ध महिलेचा असे दोन मृत्यू झाले आहेत. दिल्लीतील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता. त्यानंतर मुलापासून आईला कोरोनाची लागन झाली होती. दरम्यान, मोदी सरकारने कोरोना हे राष्ट्रीय संकट घोषित केलं आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर 


राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची तपासणीदेखील लवकर होणे गरजेचं आहे. त्यासाठी लॅब्सची क्षमता दुप्पट करण्याचाही प्रयत्न आहे. येत्या 15 ते 20 दिवसात मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुविधा देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्येही नवीन लॅब संदर्भातला निर्णय होऊ शकतो, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.


एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती


एपीएससीच्या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी एकत्र जमतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षाची रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम थांबवण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.


संबंधित बातम्या :