बुलडाणा : शेतीच्या वादातून बुलडाण्यात दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करुन भावांचा जीव घेतला. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
बुलडाण्यातील जळका भंडग मधील कोंडे कुंटुंबीयांचा त्यांच्या शेताशेजारील दोन शेतकऱ्यांसोबत धुऱ्यावरुन वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून आला.
शेतात काम करत असताना 40 वर्षीय संतोष मारोती कोंडे यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढवला. भावावर हल्ला झाल्याचं पाहताच 35 वर्षांचा भाऊ वामन मारोती कोंडे मध्यस्थी करायला गेला, मात्र त्याच्यावरही कुऱ्हाड आणि काठ्यांनी जबर हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी जळका भंडग येथे दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पिंपळगाव राजा पोलिसांनी कोंडे यांच्या शेतानजीक शेती असलेल्या आणि हत्येचा आरोप असलेल्या भागवत आणि बुंधे ह्या दोन कुटुंबांतील सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.