मुंबई उपनगरामध्ये रात्रभरात सर्वाधिक पाऊस मुलुंड, भांडुप भागात झाल्याची नोंद आहे. याशिवाय कांजूरमार्ग, पवई, अंधेरी, वांद्रे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे.
LIVE UPDATE
12.55 PM मुंबई : मध्य रेल्वेवर सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी, वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
11.05 AM मुंबई : विक्रोळी आणि कांजुरमार्ग स्थानकांच्या दरम्यान झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेवर अचानक ब्लॉक, लोकल गाड्या कमी असल्यामुळे लोकलच्या फेऱ्या रद्द, मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिरा
10.10 AM मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक 35 ते 40 मिनिटे उशिराने, अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप, विलंबाच्या कारणाबाबत कोणतीही उद्घोषणा नाही
ठाणे जिल्ह्यात रात्री बारा वाजल्यापासून 116 मिमी पाऊस झाला. ठाणे, कल्याण, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर अशा सात तालुक्यांची ही आकडेवारी आहे.
भिवंडीत शॉक लागून एकाचा मृत्यू
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचलं. 50 ते 60 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. भिवंडी शहरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. तर जैतुनपुरा भागात इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 8 ते 12 जून पर्यंत मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक मंदावली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली असून कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेही अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत.
कोकणात नांगरणी सुरु
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. काल-परवा झालेल्या पावसानंतर कोकणात ठिकठिकाणी नांगरणीची कामं होताना दिसत आहेत. मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर शेतीच्या कामांना सुरुवात करण्याची कोकणात परंपरा आहे.
दिवेघाटात पाणीच पाणी
पुणे जिल्ह्यातल्या दिवे घाटात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. घाटातल्या डोंगरावरुन पाणी वाहत आल्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.
उमरग्यात पूरपरिस्थिती
पावसामुळे उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात पूरपरिस्थिती तयार झाली. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तर शहरातले काही रस्तेही वाहतुकीसाठी बंद झाले. गेल्या 24 तासात 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सोलापुरात घरात पाणी शिरलं
सोलापुरात झालेल्या पावसाने महापालिकेने केलेले नालेसफाईचे दावे फोल ठरवले. शहरातल्या अनेक नाल्यातलं घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरलं. वाढलेल्या पाण्यामुळे शहराजवळच्या अनेक भागांचा संपर्क तुटला. शेळगी नाला ब्लॉक झाल्याने लोकवस्तीचा संपर्क तुटला. जुना कारंबा नाका ते तुळजापूर नाका रोड नाल्याच्या पाण्यामुळे बंद झाला. रामवाडी पुलाखाली पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच तारांबळ उडाली.