जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
घराच्या सुरक्षेसाठी अगोदर सहा पोलीस तैनात होते. आता 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 20 वर्षात दानवे यांनी मराठा समाजासाठी काय योगदान दिलं? असा प्रश्न बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
जालना शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला.
राज्यात आंदोलन सुरुच
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरुच आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तर पालघरमध्येही मराठा संघटनांकडून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या परळीतल्या ठिय्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे.
पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे काल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक घोषणा देत असताना स्वतः खासदार काकडेही त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी देखील घोषणा दिल्या. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येतं असलेली लोकप्रतिनिधींच्या घरासमोरची आंदोलनं ही स्टंट आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्षेप घेण्यात आला.
परळीतील आंदोलनाचा 19 वा दिवस
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. आंदोलनकर्ते मराठा आरक्षण आणि मेगा भरती रद्द करा या मागणीवर ठाम आहेत.
दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा, सुरक्षा व्यवस्थेत वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2018 02:28 PM (IST)
या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. घराच्या सुरक्षेसाठी अगोदर सहा पोलीस तैनात होते. आता 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -