Nagpur News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) वायुसेनानगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शुक्रवारी सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टरचा थरार नागपूरकरांना अनुभवता आला. सोनेगाव विमानतळावरुन उड्डाण भरल्यानंतर सूर्यकिरण एरोबॅटिक, सारंग हेलिकॉप्टरच्या चमूने चित्तथरारक कवायती सादर केल्या. तसेच पॅराग्लायडर्स टीमनेही आपले कौशल्य दाखविले. याच बरोबर ग्राऊंडवर फोर्स आर्मची प्रदर्शनही लावण्यात आली होती.


वायुसेनानगरात 'एअर फेस्ट 2022'


अधिकाधिक युवकांनी वायुदलात करिअर करावेत, यासाठीच ठराविक कालावधीनंतर एअर शो घेण्यात येतो. यापूर्वी तीन वेळा अशाप्रकारचा शो नागपुरात झाला आहे. अनुरक्षण कमानीचे मुख्य एअर मार्शल विभास पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, 19 नोव्हेंबरला वायुसेनानगरात 'एअर फेस्ट 2022'चे (Air Fest 2022) आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी दोन दिवस शहरातील आमंत्रित नागरिकांना विमानाच्या चित्तथरारक कवायती दाखविल्या जात आहे. सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना हवाई कसरती पाहण्याची इच्छा असताना मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर होणारा एअर शो केवळ निमंत्रितांसाठी असल्याने अनेकांची निराशा झाली आहे.


वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण

वायुदलाच्या अनुरक्षण कमानचे मुख्यालय असलेल्या वायुसेनानगरातील परिसरात सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, अॅवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्सने विविध कवायती सादर केल्या. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण मुख्य आकर्षण होते. निमंत्रितांसाठी असलेल्या हा एअर शोचा सराव बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 


युवकांमध्ये उत्साह


उद्या, शनिवारी होणाऱ्या एअर फेस्टची पूर्वतयारी गुरुवारपासून सुरु झाली होती. यानिमित्त हवाई दलाच्या विविध विमानांनी आकाशात गिरट्या घातल्या. अनेकांशी ते कॅमेऱ्या टिपून सोशल मीडियावर शेअर केले. यासह हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनेही चित्तथरारक कवायती सादर केल्या. सोनेगाव, जयताळा तसेच हवाई तळाच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरावरुनच याचा आनंद लुटला. तसेच व्हॅट्सअॅपवर स्टेटस, इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि स्नॅनचॅटवर स्नॅप शेअर केले. गुरुवारी पथकाने सराव केला. तर शुक्रवारी शनिवारच्या कार्यक्रमाची रंगीत तालिम झाली. गुरुवारी सूर्यकिरण विमानाने 6 विमानांचे फॉर्मेशन तयार केले होते. तर शुक्रवारी 9 विमानांनी आकर्षक फॉर्मेशन केले. तसेच सारंग टीमनेही चार एअर क्राफ्ट डिस्प्ले केले.


ही बातमी देखील वाचा


Rahul Gandhi : भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा; राहुल गांधींचा शेगावात हल्लाबोल