Breaking News LIVE : पुरेशा लस साठ्याअभावी उद्या 4 ऑगस्टला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
Breaking News LIVE Updates, 3 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
पुरेशा लस साठ्याअभावी उद्या 4 ऑगस्टला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या बुधवार दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई
अखेर 43 दिवसाच्या आंदोलनानंतर राज्यातील आघाडी सरकार बधले. अकलूज ग्रामपंचायत आता अकलूज नगर परिषद होणार. शासनाकडून अंतिम नोटिफिकेशन.
सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम. पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात केला औपचारिक प्रवेश. राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची उपस्थिती. लवकरच मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार विधीवत प्रवेश. या कार्यक्रमात अनेक तमाशा फडमालक करणार राष्ट्रवादीत प्रवेश.
परभणी-आयएएस आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाने नियुक्ती परत दिल्याने आज पदभार स्वीकारला आहे. विभागीय आयुक्तांना पदभार घेतल्याचे पत्र दिले आहे. मात्र गोयल अद्याप परभणीत दाखल झाल्या नाहीत.
ठाणे जिल्ह्यातील दुकानांना सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सोमवार ते शनिवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु, ठाणे जिल्ह्यातील मॉल्स पूर्णपणे बंदच
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील व युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र, 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट वरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे गतप्राण होवून शहीद झाले. द्रास सेक्टर जगामध्ये अति कमी तापमान असलेले ठिकाण असून येथे वजा 10 ते 20 डिग्री से. तापमान असते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असल्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या घटना घडतात.
पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड, गणेश गायकवाडसह पाच जणांवर मोक्का लावण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारात यांचा समावेश करत, अशी कारवाई केलीये. गणेश गायकवाडवर अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महिलेने दाखल केला होता. यात सासरे नाना गायकवाडसह अन्य आरोपींचा समावेश होता. त्यासह एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुरशृंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड आणि त्यांचे वडील नाना गायकवाड यांना गणेश साठे, राजू अंकुश आणि दीपक गवारे यांची साथ लाभते. ही टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका व्यक्तीने कोटमगाव जवळील उड्डाणपूल जवळ रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. धुळगाव येथील भाऊसाहेब उर्फ वाल्मीक रत्नाकर गायकवाड (वय 38) याने मनमाड दौंड अपलाईन वरील मालगाडी खाली दुपारच्या सुमारास स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला. दरम्यान ही आत्महत्या कोणत्या कारणासाठी झाली आहे याचा पोलीस कसून तपास करत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाईची विशेष मोहीम राबवली. जिल्ह्यात नगर तालुक्यासह, भिंगार, श्रीरामपूर, राहुरी आणि शेवगाव तालुक्यात 9 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू, देशी दारू, कच्चे रसायन, भट्टीची साधने, नवसागर असा तब्बल 5 लाख 1 हजार 960 रूपायांचा मुद्देमाल पोलिसांनी जावोत केलाय. दरम्यान या प्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.
सीबीएसई दहावी बोर्ड निकाल एकूण निकाल - 99.04 टक्के
उत्तीर्ण मुलांचा निकाल - 98.89 टक्के
उत्तीर्ण मुलींचा निकाल -99.24 टक्के
पुणे विभागाचा निकाल - 99.92 टक्के
देशात 90 ते 95 टक्के दरम्यान गुण मिळलले विद्यार्थी - 200962 (9.28टक्के)
देशभरात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी - 57824 (2.76 टक्के
पालघर मधील सूर्या नदीत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उर्से - म्हसाड येथील सदाशिव शंकर मातेरा अस या 34 वर्षीय तरुणाचं नाव असून नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. ही भेट दुपारी दोन वाजता होणार असून अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. सहकार मुद्द्यावर ही भेट असल्याची सूत्रांची माहिती असून पवारांसोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही असणार असं कळतंय.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी दारव्हा नगराध्यक्ष हरविल्याचे पोस्टर लागले आहेत. काल रात्रीतून अज्ञात व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत. दोन वर्षापासून दारव्हा नगरपरिषदेत नगराध्यक्ष बबन इरवे हे आले नाहीत, त्यांचा मुलगा नगरपरिषदेच्या कामात ढवळाढवळ करतो असाही आरोप केला गेलाय. दारव्हा नगरपरिषद मध्ये 20 सदस्य असून शिवसेनेची सत्ता आहे.
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. CBSEच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे
कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरनासाठी एमएमआरडीएने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी 87 कोटी, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी 111 कोटी, कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी 123 कोटी ,कल्याण पश्चिमसाठी 37 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे रस्ते विकासासाठी एमएमआरडीएने निधी द्यावा अशी मागणी खासदार श्रीकांत यांनी केली होती
शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे, हे मी आधीपासून सांगत आलोय. आता काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनीही शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी विरोधी असल्याचं सांगीतलंय. त्यामुळे काँग्रेसला आता ओबीसी समाजाचा खरंच कळवला असेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर केला जाणार आहे. CBSEच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान ते नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडचे एसआरटी विद्यापीठ, गुरुद्वारा, परभणीचे कृषी विद्यापिठ इथे भेटी देऊन ते तिन्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.
परभणी : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान ते नांदेड,हिंगोली,आणि परभणी जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहेत. 5 ऑगस्ट रोजी राजपाल सकाळी नांदेड येथे दाखल होणार असुन पहिल्यांदा ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जाणार असून विद्यापीठातील अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावून नांदेड येथील गुरुद्वारा येथे भेट देऊन तिथला आढावा घेणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ही घेणार आहेत. नांदेडला मुक्काम करून 6 ऑगस्ट रोजी ते हिंगोली दोऱ्यावर जाणार आहेत हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन परभणीला निघणार परभणीत जिल्हाधिकारी कार्यलयात आढावा बैठक घेऊन ते मुक्कामी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे मुक्कामी राहणार आहेत.7 ऑगस्टला दिवसभर कृषि विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सांयकाळी मुंबईत परतणार आहेत. राज्यपाल येणार असल्याने तिन्ही जिल्ह्यातील प्रशासन कामाला लागले आहे.
औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या उपसभापतींना मारहाण केली. औरंगाबादचे काँग्रेस सदस्य अनुराग शिंदेंसह सहा ते सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप उपसभापती अर्जुन शेळके यांनी केलाय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपसभापती शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शेळके यांना दहा तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवार अनुराग शिंदे यांना नऊ मते पडली होती. पराभव सहन न झाल्याने विरोधकांनी हल्ला केला असा आरोप उपसभापती अर्जुन शेळके यांनी केलाय. दरम्यान, या मारहाणप्रकरणी काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे, विजय जाधव यांच्यासह 6-7जणांविरुद्ध सिटी चौक पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलंय. काल संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत जवळपास सव्वा तास खलबतं झाली.. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचंही राऊतांनी सांगितलंय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांना दिलेल्या चहापानाच्या निमंत्रणाला १७ पक्षांनी प्रतिसाद दिलाय आणि या पक्षांचे सुमारे १०० खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राजद, समाजवादी पार्टी, सीपीएम यासह अनेक पक्षांचे खासदार बैठकीसाठी पोहचले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत आणि अरविंद सावंत बैठकीला पोहोचले आहेत. पेगॅसस आणि कृषी धोरणावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे.
पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.
सावली तालुक्यातील व्याहाड परिसरातून आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश. व्याहाड गावतून वनविभागाने 27 जुलै ला एका 3 वर्षीय मादी बिबट्याला केले होते जेरबंद मात्र या परिसरात आणखी एक बिबट्या असल्याने वनविभागाने पुन्हा पिंजरे लावले होते. आज पहाटे व्याहाड गावाशेजारी पुन्हा एक 3 वर्षीय मादी बिबट्या जेरबंद झाली. या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले होते. आज जेरबंद केलेल्या बिबट्याला पुढील कारवाई नंतर जंगलात सोडण्यात येणार आहे.
मातेनेच गतीमंद असल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना घडलीय. सांगलीतील लक्ष्मीनगर मध्ये 31जुलै रोजी ही घटना घडली होती. बालिका गतीमंद असल्याने तिच्या आईनेच एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालं. संजयनगर पोलिसांनी रेवती संजय लोकरे या महिलेस केली आहे. ज्ञानदा संजय लोकरे (वय 2) असं मृत मुलीचं नाव आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री त्यांना अभिवादन करणार असून त्यासंबंधीचा कार्यक्रम दुपारी सव्वाबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
पार्श्वभूमी
राज्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर; सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे. उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकान उघडली जातील तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यस सेवेची दुकानेच सुरु राहतील. वॉकिंग सायकलिंग आणि एक्ससाइजसाठी गार्डन्स मैदाने उघडे राहतील.
आज बारावीचा निकाल; आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार
काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
राज्यात काल 4869 रुग्णांची नोंद, तर 8429 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात काल 4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे.
राज्यात काल कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -