Sharad Ponkshe : जाती नष्ट करण्यासाठी ब्राह्मण महासंघ एक झाला पाहिजे असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केलं आहे. तसेच एकच हिंदू जात राहायला हवी असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात ब्राह्मण नियतकालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी हे वक्तव्य केलं आहे. जातीयवाद्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करुन टाकलं आहे. ते सुधारण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा असेही पोंक्षे यावेळी म्हणाले.
पुण्यात आज ब्राह्मण नियतकालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ब्राह्मण भूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार अभिनेते शरद पोंक्षे यांना देण्यात आला. तर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनचांही ब्राह्मण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
विविध जातींचे संघ संपवायला हवेत
जातीयवाद्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करुन टाकलं आहे. ते सुधारण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. जाती नष्ट करण्यासाठी ब्राह्मण महासंघ एक झाला पाहिजे असे पोंक्षे म्हणाले. जात संपवण्यासाठी ब्राह्मणांनी पुढे यायला हवे. विविध जातीच्या समाज सुधारकांनी समाज सुधारणा केली, यात ब्राह्मणांचाही मोठा वाटा असल्याचे शरद पोंक्षे म्हणाले. सध्या जाती जातींमध्ये मोठी तेढ निर्माण झाली आहे. मराठा, कुंभार, ब्राह्मण असे विविध जातींचे संघ निर्माण झाले आहेत. ते सर्व अगोदर संपवायला हवेत, फक्त एकच हिंदू जात राहायला हवी असे पोंक्षे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुरु केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत, तेवढेच मला बाबासाहेब आंबेडकर देखील प्रिय असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितलं.
शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र, शरद पोंक्षे हे त्यांच्या विविध विधानांमुळे सतत चर्चेत असतात.
महत्त्वाच्या बातम्या: