माढा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न काही संघटनांकडून पुढे केला जात असताना 'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको आहे तर अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावं', अशी मागणी माढा येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली आहे.
माढा येथे आज ब्राह्मण समाज सेवा संघाने तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुन्हा एकदा ब्राह्मण समाजासाठी अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. 'आम्हाला आरक्षण नको पण अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या', अशी मागणी आता पुन्हा एकदा ब्राह्मण मेळाव्यातून समोर येऊ लागली आहे. त्यामुळे एखाद्या प्रवृतीवरून संपुर्ण समाजाला बदनाम करण्याच्या प्रकारास आळा बसू शकेल, असा सूर या अधिवेशनात निघाला. यासाठी महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण परिषदेने या प्रश्नावर ब्राह्मण समाज जागृतीचे अभियान हाती घेतले असल्याचे परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा.मोहिनीताई पत्की यांनी सांगितले. यासोबतच समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राज्यातील पुरोहितांना 5 हजार रुपये मानधनाची मागणी देखील या मेळाव्यात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होत असतात. यातच ब्राम्हण मुख्यमंत्री अशी ओळख पुसण्यात यशस्वी झालेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्थीचे प्रयत्न करत मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मिळवून देण्यात यश मिळविले. याच पद्धतीने धनगर समाजाला देखील विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत अनेक सवलतीही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचाही जोर वाढलेला दिसत आहे.
ब्राम्हण समाजाने आरक्षण मागितले नाही. 'सेव्ह टॅलेंट सेव्ह नेशन' ही संकल्पना आता पुढे येत आहे. राज्यात सुमारे दीडशे पुस्तकांमध्ये ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून समाजाची बदनामी करण्यात आली असल्याचे मेळाव्यात सांगण्यात आले आहे. समाज पुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर समाजाला आरक्षण नको संरक्षण हवे आहे, अशी मागणी मेळाव्यात झाली. समाजातील युवकाना रोजगार उपलब्ध व्हवा, उद्योगधंदे सुरू करता यावेत यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे आणि राज्यातील पौरोहित्य करणाराना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जावे, या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच ब्राह्मणांच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळतात, असा त्यांच्यावर समाजातून आरोप होत असताना आता निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांकडे पोहचणार कि त्यासाठी पुन्हा चंद्रकांत पाटील अथवा दुसऱ्या एखाद्या नेत्याला मध्यस्थी करावी लागणार हे पाहावे लागेल.
'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या', माढा येथील ब्राह्मण अधिवेशनात मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2019 05:43 PM (IST)
राज्यात सुमारे दीडशे पुस्तकांमध्ये ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून समाजाची बदनामी करण्यात आली आहे, समाज पुरूषांच्या पुतळ्याची विटंबना केली जात असल्याचंही मेळाव्यात सांगण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -