औरंगाबाद :  औरंगाबादमध्ये मनसे चित्रपट सेनेने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिक टॉक व्हिडीओ बनवण्याची. या स्पर्धेतून टिक टॉक किंग आणि टिक टॉक क्वीन निवडण्यात येणार आहेत. टिक टॉक ॲपवर आपल्या कला सादर करणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

टिक टॉकच्या नादात आज तरुणाई वेडी झाली आहे. टिक टॉकवर फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात कशाही प्रकारचे व्हिडीओ काढले जातात. औरंगाबादमधील अनेक तरुण-तरुणींचे टिक टॉकवर लाखो वर फॉलोअर्स आहेत. इथल्या तरुणांमधील टिक-टॉकची जबरदस्त क्रेझ पाहता मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.



मराठवाड्यातील टिक टॉकवर असलेल्या कलाकारांच्या कलेला मिळावा म्हणून या स्पर्धेचे असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या अंतर्गत “येरे-येरे पावसा-2...’ या चित्रपटातील  “अश्विनी ये ना...’ या गाण्यावर 15 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून स्पर्धेशी संबंधित आयोजकांच्या व्हाटॅसअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडिओमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास व्हिडीओ बाद करण्यात येईल, अशी अट देखील घातली आहे. या स्पर्धेचा निकाल मनसेच्या चित्रपट सेनेच्या वेबसाईटवर 13 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. बक्षिस वितरणाचे स्थळ, दिनांक, वेळ जाहीर करण्यात येईल असं आयोजकांनी सांगितलं आहे.