सांगली : सांगलीतील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. विट्याच्या गार्डी इथे 2012 मध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर सात वर्षांनी न्यायालयाचा निर्णय आला आहे.


काय आहे प्रकरण?
विटाजवळच्या गार्डी इथे 12 ऑक्टोबर 2012 रोजी एक 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला होता. संबंधित तरुणी प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिलीचा 16 ऑक्टोबर रोजी विट्यातील एका पडक्या विहिरीत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत मुलीचे गावातील लक्ष्या उर्फ लक्ष्मण सरगर याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी सरगरला ताब्यात घेऊन चौकशी केली. मित्रांसह तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो विहीरीत फेकून दिल्याची कबुल लक्ष्मण सरगरने दिली होती.

यानंतर विटा पोलिसांनी मृत तरुणीचा प्रियकर लक्ष्मण सरगर, अनुज अर्जुन पवार आणि दादासो भास्कर आठवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालयात 16 जुलै 2019 रोजी खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली.

मृत मुलीच्या कुटुंबीयांना 75,000 रुपये देण्याचा आदेश
यामध्ये सरकारी पक्षाने एकूण 20 साक्षीदारांचा जबाब नोंदवत वकील उल्हास चिप्रे यांनी संबंधित घटना कोपर्डीप्रमाणेच गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिलं आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर परस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरुन आरोपींनी बलात्कार करुन खून केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच प्रत्येक आरोपीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25,000 रुपयेप्रमाणे एकूण 75,000 रुपये देण्याचे आदेश दिले.