भिवंडी: भिवंडीत पतंग उडवण्यासाठी तांब्याच्या तारांचा वापर करणं भावंडांच्या जीवावर बेतलं आहे. नुरीनगर भागात राहणाऱ्या भावंडांनी पतंग उडवण्यासाठी मांजाऐवजी तांब्याची तार वापरली. दुर्दैवानं ही तार अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनी तारांच्या संपर्कात आली. यावेळी मोठा स्फोट झाला आणि यामध्ये 11 वर्षांचा नौशाद अन्सारी 70 टक्के आणि 16 वर्षांचा अफरोज अन्सारी 40 टक्के भाजला.

सध्या या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान या प्रकारानंतर संपूर्ण परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला. तर शॉर्ट सर्किटमुळं अनेकांच्या घरातले टीव्ही, फ्रीज, फॅन जळाले आहेत.



नौशात आणि अफरोज हे दोघे काल दुपारी परिसरातील सार्वजनिक शौचालयावर चढून पतंग उडवत होते. या दोघांनी पतंग उडवण्यासाठी चक्क तांब्याची तारच जोडली. मात्र जवळच हायटेन्शन वायर असल्याची जाण त्यांना नव्हती.

दोघा भावांनी पतंग उडवताच, तांब्याच्या तारेचा आणि हायटेन्शन वायरचा संपर्क आला. त्याक्षणी तातडीने स्फोट झाला आणि तांब्याच्या तारेतून त्याचा झटका दोन्ही भावंडांना बसला. दोघेही जबर भाजले गेले, तर शॉर्टसर्किटमुळे अनेक घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे, बल्ब उडाले. नेमका प्रकार काय झाला हे घरात असलेल्या लोकांना काहीवेळ समजला नाही. काहींनी बाहेर येऊन पाहिलं असता, हा प्रकार समजला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे.