मुंबई : पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे याचं आयोजन करावं आणि 75 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देशही आयोजकांना दिलेत. तसंच या नियमांची आणि इतर कायदेशीर बाबींची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि राज्य सरकराची राहील असे निर्देशही हायकोर्टानं शुक्रवारी दिलेत.
त्याचबरोबर ही याचिका खुली ठेवत यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनात काही नियमभंग झाल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. 'जर ही याचिका कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर न येता थोडी आधी आली असती तर ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणाच्या मुद्यावर याला परवानगीच नाकारली असती' असं विधान हायकोर्टानं केलं.
ध्वनीप्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, केवळ भारतीय सणांवरच बंधन का? अशी प्रमुख मागणी करत अमोल बालवडकर यांच्यावतीने दाखल याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
ध्वनीप्रदुषणाबाबतची नियमावली स्पष्ट असतानाही आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिव्हलच्या नावाखाली इथे ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवले जातात. दुपारी ३ ते मध्यरात्री उशिरापर्यंत इथे डॉल्बी साऊंडवर डीजेचे कार्यक्रम कर्णकर्कश आवाजात सुरू असतात, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रवेशिकेवर 'कार्यक्रम रात्री 10 नंतर सुरु' असा स्पष्ट उल्लेख असल्याचे पुरावेही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात सादर केले.
वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सांभाळून सण साजरे करण्याचं बंधन सर्वसामान्यांवरच का? 'सनबर्न'लाही कायदा सारखाच असायला हवा अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीनं अड. अनुराग जैन यांनी हायकोर्टात केली होती. त्यानुसार 'शांतता क्षेत्र नसलं तरीही ध्वनी मर्यादा आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलंय.
नववर्षाच्या स्वागतासाठी 29 ते 31 डिसेंबर दरम्यान पुण्यातील बावधन लवळे इथल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबवर यंदचा 'सनबर्न फेस्टिव्हल' रंगणार आहे. हा एक प्रतिष्ठित असा जगप्रसिद्ध संगीत महोत्सव असून जगभरातील प्रसिद्ध संगीत कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. दरवर्षी आम्ही सर्व प्रकारचे 19 परवाने काढतो त्यासाठी लाखो रूपयांचं शुल्कही अदा करतो. साधारणत: कार्यक्रम सुरु होण्याच्या २४ तास आधी सर्व परवाने घेतले जातात. तसेच आम्ही सर्व नियम आणि आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतो, मात्र तरीही दरवर्षी ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर हायकोर्टात विरोध करणारी याचिका दाखल होते अशी बाजू सनबर्नचे आयोजक असलेल्या परसेप्टकडून मांडण्यात आली.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला हायकोर्टाची सशर्त परवानगी
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
28 Dec 2018 05:39 PM (IST)
पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -