मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या (Maharashtra Rajya Kustigir Sangh) निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटाला कोणताही ठोस दिलासा न देता त्यांचा याचिका निकाली काढली आहे. नुकत्याच झालेल्या संघटनेच्या निवडणुकीविरोधात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांकडे दाद मगाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. पुढील 10 दिवसांत हे अपील दाखल केल्यानंतर त्यावर महिन्याभरात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेविरोधात दाखल केलेली अवमान याचिकाही बुधवारी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली. मात्र नवी कार्यकारणी हे अपील निकाली निघेपर्यंत जाहीर करू नका असे निर्देश हायकोर्टानं राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला दिले आहेत.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणी तातडीनं बरखास्त करून नव्याने तातडीने कमिटी नियुक्त करण्याच्या करण्याच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अचानकपणे ही संघटना बरखास्त करण्याचा राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचा निर्णय हा नैसर्गिक न्यायालयाला अनुसरून नाही, असा दावा करत बाळासाहेब लांडगे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय कुस्तीगीर संघानं 30 जूनच्या बैठकीत महाराष्ट कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तीन सदस्यांची तात्पुरती कमिटी नियुक्त केली. या काळजीवाहू कमिटीनं तातडीनं निवडणूक जाहीर करून बिनविरोध कमिटीच जाहिर केली होती. निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास कोर्टाची मनाई असतानाही अध्यक्षांनी सोशल मीडियावर बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिका-यांचं अभिनंदन केलं होतं, ज्यावरून याचिकाकर्त्यांनी त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी नामांकन भरलेल्या तीन अर्जापैकी धावलसिंग मोहिते पाटील आणि काका पवार यांनी दोघांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपद हे आपोआप भाजपचे खासदार तडस यांच्या पदरात पडले. पण हे होत असताना नक्कीच राजकीय खेळी झाली आहे, कारण संघटनेच्या सचिवपदी आता काका पवार तर कार्याध्यक्ष पद हे धवलसिंग मोहिते- पाटील यांना देण्यात आलं आहे. मात्र अशा प्रकारे संघ बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार राष्ट्रीय संघाला नाही. राष्ट्रीय संघटनेनं कारणे दाखवा नेाटीस बजावून संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देत रितसर सुनावणी घेणं अपेक्षित होतं. मात्र राष्ट्रीय संघटनेनं बेकायदा आणि मनमानी पद्धतीनं हा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रीय संघटनेनं कार्यभार सांभाळण्यासाठी बनवलेल्या त्रिसदस्य कमिटीनेनं केवळ निवडणुकीचा फार्स तयार करून बिनविरोध आपलीच नवी कार्यकारणी जाहीर केली आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.
कुस्तीगीर परिषदेतलं राजकरण
राज्यात सत्ताबदल होताच गेल्या अनेक दशकांपासून राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेल्या शरद पवारांना या बरखास्तीमुळे धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे आहे. यातच आता भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ज्यात शरद पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. त्याचा कारभार सांभाळणारे बाळासाहेब लांडगे हे मागील 40 वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिव पदावर होते, पण त्यांच्या कार्यकाळ हा कायम वादग्रस्त राहिला आहे. अनेकदा तक्रारी करून सुद्धा काहीच झालं नाही. तसेच भारतीय कुस्तीगीर संघानं घ्यायला लावलेल्या स्पर्धांचं आयोजनच होत नसल्याचा ठपका ठेवत भारतीय कुस्तीगीर संघानं ही करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.