नागपूर: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि वाद यांची मालिका कायम आहे.


कारण आता मंडळाने छापलेल्या इतिहासाच्या नववीच्या पुस्तकात, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात युवक काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे.

राजीव गांधी पंतप्रधान असताना, संरक्षण साहित्य खरेदीच्या बोफोर्स प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे राजीव गांधी यांच्यावर बरीच टीका झाली आणि निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव झाला असा उल्लेख, नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आला आहे.



त्यामुळे काँग्रेसने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, राजीव गांधी यांना बदनाम करण्यासाठी, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

बोफोर्सबाबत नेमका काय उल्लेख आहे?

संरक्षण सामग्री आणि विशेषत: बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधींवर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकीचा मुद्दा बनला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्रीपदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली.