सांगली : मिरजेतील लक्ष्मी मार्केटमध्ये वर्दळीच्या चौकात भलीमोठी काळी बाहुली टांगण्यात आली आहे. विजेच्या तारेला एक राक्षसमुखी तंत्र-मंत्र असणारी ही बाहुली सध्या सांगलीत चर्चेचा विषय ठरली आहे.


सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत काळ्या जादूचा प्रयोग होतोय का, याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे त्या विभागात राहणारे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नगरसेवकही घाबरून गेले आहेत.

अंधश्रद्धेतून प्रकाराचा संशय

प्रचारामध्ये हायटेक प्रचाराबरोबरच अनिष्ट प्रथांचाही वापर काही उमेदवार करत आहेत. यामध्ये अंधश्रद्धेला बळी पडलेले आणि त्या विचारांना चिकटलेले लोक आजही अंधश्रद्धेचा आधार घेऊन त्याचा प्रचारात वापर करत असल्याचे मिरजेत दिसत आहे.

राक्षसमुखी कथित मंतरलेली बाहुली ही प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव व्हावा, या हेतूने लावल्याची चर्चा मिरजेत सुरू आहे. त्यामुळे बाहुली लावलेल्या प्रभागातील नगरसेवकही आणि उमेदवार हादरुन गेले आहेत. तसेच, चर्चेचा विषय बनलेली राक्षसमुखी बाहुली पाहण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन वादग्रस्त बाहुली काढून ताब्यात घेतली आहे.  याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात येणार असून, असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाहीदेखील स्मृती पाटील यांनी दिली आहे.