जालना : आरक्षणाच्या भूमिकेवर सरकारचा वेळकाढूपणा चालला असून, आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नाहीय, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. तसेच, मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल, याची खात्री काय? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री खोटे बोलतात, 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे बदलले, तशीच त्यांच्या विषयीची आपली भूमिका बदलली. एक पूर्णच्या पूर्ण माणूस बदलू शकतो, मग त्याच्याबद्दलची भूमिका बदलणारच ना”, असे म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधांनांबाबत आपली भूमिका बदलल्याचे सांगितले.

“गेली चार वर्ष फक्त नोटबंदी, योगा, जीएसटी आणि स्वच्छ भारत यावरच मोदींनी वाया घातली. पंतप्रधानांना त्यांच्या मतदारसंघातली नदी देखील स्वच्छ करता आली नाही.”, असे म्हणत राज ठाकरेंनी स्वच्छ भारत अभियानावर देखील टीका केली.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

अनेकवेळा सर्व सोडून द्यावं वाटतं, कारण युवकांना सगळं सांगूनही फरक पडत नाही, अशी नाराजी देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, सरकार सर्वांना मूर्ख बनवत असून, सध्या कुठलीही निवडणूक नसताना मी तुम्हाला जाग व्हा म्हणायला आलोय, अस सांगत आगामी पाच वर्षे असे वाया घालू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्याना दिला.

VIDEO : राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद :