मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र अखेर या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. येत्या निवडणुकीत मनसे महाघाडीत नसेल, मनसेने यावं याबाबत चर्चा झाली, पण राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार-राज ठाकरेंचा एकत्रित विमानप्रवास
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल (25 सप्टेंबर) औरंगाबादमध्ये एका हॉटेलमध्ये होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते, तर शरद पवार माजी मंत्री भारत बोन्द्रे यांच्या नागरी सत्कारसाठी बुलडाणा येथे गेले होते. त्यांनी मुंबईत येताना विमानप्रवासही एकत्रच केला.
काही दिवसांपूर्वीच मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध असल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं होतं. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपमांनी स्पष्ट केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे.