सांगली : एकीकडे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे सदाभाऊंनी थेट भाजपचा झेंडा असलेली मफलर गळ्यात अडकवून भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली. सांगलीतील भाजपच्या प्रचार सभेत हे चित्र पाहायला मिळाले.


भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्याच्या सभेने केला. कवलापूरमधील नियोजित विमानतळाच्या मैदानात झालेल्या या सभेला चंद्रकांत पाटील यांच्यापासून जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलल्या अनेक नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसले होते.



सदाभाऊ फक्त व्यासपीठावर बसलेच नाहीत, तर काही वेळासाठी भाजपवासी देखील झाले. भाजपच्या कार्यकर्त्याने अन्य नेत्यांबरोबर सदाभाऊंच्या गळ्यात देखील मफलर टाकला. विशेष म्हणजे सदाभाऊंच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही. मफरल गळ्यात घालून त्यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा देखील केली. मात्र, सत्काराच्या वेळेस भाजपचा मफरल  सदाभाऊंनी काढला.

मागील काही दिवसांपासून खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याबदल ज्या पद्धतीची चर्चा होत आहे, ते पाहता मुख्यमंत्री आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र सदाभाऊंच्या गळ्यात काही काळ भाजपची मफरल पाहून हायसे वाटले असावे.