सोलापूर : माढा तालुक्यातील मानेगाव या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आजी-माजी आमदारांची मुले निवडणूक रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ हाय प्रोफईल बनला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत, भाजपचे माजी आमदार धनाजी साठे यांचे पुत्र दादा साठे हे मानेगावमधून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
माढा तालुक्यातील मानेगाव हा मतदारसंघ सीना नदीच्या काठावरील अत्यंत सधन असा भाग म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे येथून चक्क अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर त्यांचा सामना करण्यासाठी भाजपने माजी आमदार धनाजी साठे यांचे पुत्र दादा साठे याना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यानेही याच मतदारसंघातून धनुष्यबाण हाती घेतल्याने या मतदारसंघाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीने पहिल्यांदा अमोल चव्हाण या तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी व पक्षाचा AB फॉर्म दिला होता. मात्र, या गटातून शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य आणि भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले. सावंत यांचा या गटात मोठा दबदबा असून पृथ्वीराज याला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळेल या भीतीने राष्ट्रवादीचे आमदार शिंदे यांनी अधिकृत उमेदवारी रद्द करून आपल्या मुलाचा भरलेला अपक्ष अर्ज या गटातून कायम ठेवला.
आता या आमदार पुत्राला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची नामुष्की आली आहे. राज्यातील सत्ताधारी भा जपने मग आपणही मागे नाही, हे दाखवण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार आणि आता माढ्यातील भाजपचे नेते असलेल्या धनाजी साठे यांचा पुत्र दादा साठे याना या मानेगाव गटातून उतरवून निवडणुकीतील रंगात वाढवली आहे.
या मतदारसंघातील तिघेही उमेदवार साखर कारखानदार असल्याने येथे उसाच्या दबावाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. तिघेही उमेदवार राजकीय वारसा लाभलेला असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या गटातून निवडणूक लढविण्याचा विचारच सोडून द्यावा लागला आहे. तिघेही आमदार पुत्र हे ‘लक्ष्मीपुत्र’ असल्याने येथे काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीकडून अपक्ष निवडणूक लढवत असलेले रणजित शिंदे यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले असले तरी आपली उमेदवारी जनतेतून आल्याने आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर जेएसपीएम या शिक्षण साम्राज्याची ताकद मागे असलेल्या पृथ्वीराज सावंत यांनी मात्र अनेक वर्षांपासून विकासात मागे राहिलेल्या या भागाचा विकास करण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या दडपशाही विरोधात आवाज उठविण्यासाठी रिंगणात उतरल्याचे सांगितले. भाजप उमेदवार दादा साठे यांनी मात्र आमच्या पक्षाकडे संपूर्ण गटात संपर्क असलेला उमेदवाराच नसल्याने आपण या गटातून निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.