हिंगोली : देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनात विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाचे नेतेही उतरु लागले आहेत. हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेत, भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला असताना, या आंदोलनात भाजपचे माजी खासदारही सहभागी झाले आहेत. हिंगोलीचे माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी आपल्या शेतातील पाच एकरवर असलेल्या वांग्यांच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक उद्ध्वस्त करुन टाकले.

वांग्याला बाजारात केवळ तीन ते पाच रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली.

हदगाव येथील आपल्या शेतात सुभाष वानखेडे यांनी पाच एकरमध्ये वांग्याचे पीक घेतले होते. बाजारात वांगी विक्रीसाठी नेले असता, त्यांना केवळ तीन रुपये किलो भाव मिळाला. कांद्याला जास्तीत जास्त पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही. त्यामुळे संतप्त वानखेडे यांनी ट्रॅक्टरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.

दरम्यान, सुभाष वानखेडे यांची पुन्हा आपला मूळ पक्ष शिवसेनेकडे वाटचाल सुरु असल्याची जोरदार चर्चा हिंगोली जिल्ह्यात आहे.