Bjp Maharashtra : भाजपच्या (Bjp) गोटातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गज नेते विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचं सांगितल्याची माहिती पुढे आली आहे.


तर लोकसभा निवडणुकांचे निकाल लक्षात घेता, भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचे पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील आमदारांसह भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची दमछाक वाढली आहे. असे असतांना भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर (Rahul Lonikar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे.


राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय?


मराठवाड्यातील परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा, असे कारण देत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राहुल लोणीकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपला राजीनामा पाठवला असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यांनी आपल्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आगामी काळात मतदारसंघात पूर्णपणे वेळ देऊन पक्षाचे काम करण्यासाठी जबाबदारीपासून काही काळ लांब राहत असल्याचे मत राहुल लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे. 


2019 लोकसभा निवडणूक-परतूर मतदारसंघातील बलाबल 


संजय जाधव (शिवसेना)---79 हजार 636
राजेश विटेकर (राष्ट्रवादी)--60 हजार 914


मतदारसंघातील प्रश्न काय?


आरोग्य, पाणी आणि बेरोजगारीचा प्रमुख प्रश्न या मतदारसंघात आहे. औद्योगिक विकास नसल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्या समस्या काही अंशी दूर झाल्या असल्या तरी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याच्या बाबतीत परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अनेक निवडणुकीत उमेदवारांकडून आश्वासन मिळत असले तरी हे रुग्णालय होऊ शकले नाही. विकासाचे अनेक प्रश्न मतदार संघात कायम आहेत, त्यातील काही प्रश्न सोडवण्यात विद्यमान आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना यश आले असले तरी अद्याप आरोग्य, पाणी, सिंचन, आणि औद्योगिकरणाच्या बाबतीत मागासलेपणा कायम आहे. साहजिकच या निवडणुकीत झालेल्या आणि न झालेल्या कामांचे मुद्दे चर्चेत येणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या