Shivsena Vs MNS: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये आरोप- प्रत्यारोप, टीका या मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच या टीकाचे पडसाद आता राज्यभरात दिसून येत आहेत. काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Shivsena Vs MNS) यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची (Amol Mitkari) गाडी फोडली होती. त्यानंतर राज ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता काल (शनिवारी) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या, थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून मनसैनिकांनी गोंधळ घातला. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत (Sanjay Raut), यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कोणताही उल्लेख केला नाही. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. 


नेमकं काय घडलं?


उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackrey) काल ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Theackrey) यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. 



या घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया


या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर नारळ फेकून गाडीच्या काचा फोडल्याचे कृत्याचे समर्थन केले. एखादी गोष्ट सुरुवात करताना विचार करायचा असतो, पुढे त्याचा काय परिणाम होऊ शकतात. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.



संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत. तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. मराठवाड्यात जे झालं ते आणि काल जो प्रकार घडला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. हे कोणालाही आवडलेलं नाही. आपणही काचेच्या घरात राहतो. आपणही दौऱ्यावर जातो, सभा घेतो, याचं भान प्रत्येकाला असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने असंच करायचं ठरवलं तर महाराष्ट्रात काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. 


कालची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती. त्यामुळे प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सारवासारव करु नये. मराठा आंदोलकांच्या आडून राजसाहेबांवर हल्ला करण्यात आला. पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. 


संजय राऊत यांची या घटनेवर प्रतिक्रिया काय?


दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं.  नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या (MNS) रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले आहे. 


 



ठाण्यात जो प्रकार घडला तेथील लोक दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचे लोक होते. महाराष्ट्रात गोंधळ करण्यासाठी त्यांना सुपारी देण्यात आली होती, ती सुपारी ठाण्यात वाजली. अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या देऊन दिल्लीतून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या गोंधळाची मजा पाहत बसलाय. विधानसभा निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडणारच. मी इकडे कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. कारण जे काही चाललंय ते दिल्लीतून अहमदशाह अब्दालीने दिलेल्या सुपारीवरुन चाललंय. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना काही कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. त्यानुसार हे नेते काम करत आहेत, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.


जितेंद्र आव्हाड यांची सोशल मिडीयावर पोस्ट


उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाज यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये आव्हाड लिहतात, "उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे  पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही."






 


"जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही," अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.