बीड : कमी जागा मिळालेल्या असताना भाजपने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. 34 मतांसह भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 25 मतं मिळाली.

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढलं. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेनेही मदत केली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पंकजा मुंडे सकाळीच बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. शिवाय विनायक मेटे आणि शिवसेनेचे बदामराव पंडितही उपस्थित होते. धस गटाच्या सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने बीडमध्ये आणण्यात आलं.

बीडमध्ये राष्ट्रवादीत फूट?

बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.

शिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागरांना घरातूनच आव्हान निर्माण केलं होतं. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

भाजपला मिळालेली मतं

  • भाजप 20

  • सुरेश धस गट 5

  • शिवसंग्राम 4

  • शिवसेना  4

  • काँग्रेस 1

  • एकूण 34


बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60

  • राष्ट्रवादी- 25

  • भाजपा- 19

  • काँग्रेस- 03

  • शिवसंग्राम- 04

  • शिवसेना- 04

  • काकू-नाना आघाडी- 03

  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)

  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)


संबंधित बातमी :


तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष