मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांची पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. याबाबत बोलताना  भारतीय जनता पक्ष मलाच पुण्यातून लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात काकडे बोलत होते.

संजय काकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचदरम्यान काकडेंची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे काकडे भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चादेखील रंगत आहेत. परंतु अजूनही भाजप आपल्यालाच लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास काकडे यांना वाटतो.

काकडे म्हणाले की, "पुणे शहरात मी इतकं पेरलंय (काम केलंय)की भाजपने जर आज एखादे सर्वेक्षण केले तर त्यांच्याही लक्षात येईल की, पुण्यातील 70 टक्के जनता माझ्या बाजूने आहेत. पुण्यात जे उमेवार आहेत, त्यामध्ये मला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळेल." त्या आधारावर मला पुण्यातून लोकसभेचे तिकीट मिळू शकते.

VIDEO


पक्षावरील नाराजीबाबत काकडे म्हणाले की, "मी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपमध्ये आहे. परंतु माझ्याच पक्षातील काही लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचतात. मुख्यमंत्र्यांचे कान भरतात. त्यामुळे मला अनेकदा अडचण होते."