मुंबई :  रिपब्लिकचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपला घेरलं आहे. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? असा सवाल सवाल उपस्थित केला आहे.


रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे.





पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे. दासगुप्ता व अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप संभाषणाचे स्क्रीनशॉट शुक्रवारी समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरले.


अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमध्ये पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, असे अर्णब गोस्वामी म्हटल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या हल्ल्याबाबत आक्षेपार्ह विधान आढळले आहे.


सोशल मीडियावर मीम्स आणि टीकेचा भडीमार काल दिवसभर होत होता. त्यामुळे आता या प्रकरणात कुठले नवीन वळण येतंय ते पाहणं महत्त्वाचे असणार आहे. मात्र या चॅटमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याची उत्तरं सर्वांनाच अपेक्षित असणार आहे.