अहमदनगर : पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. दानवेंच्या या विधानावरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केले.


दानवे नेमकं काय म्हणाले?

"गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. परंतु, जमावामध्ये अशाप्रकारे जी गोळी लागली, ती चुकीची मारली गेली. पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे.", असे रावसाहेब दानवे म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांनी गृहखातं सांभळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार आहे. अशाप्रकारचा गोळीबार पुढच्या काळात होणार नाही, अशी खात्री ते बाळगतील. आमची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी या विषयावर आम्ही चर्चा करु.", असेही दानवे म्हणाले.

ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडली. गोळीबार चुकीचा असून, घटना अयोग्य असल्याची कबुलीही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत देणार

शेतकरी आंदोलनात गोळीबारातील दोघा जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ. शिवाय, शेतकर्‍यांना न्याय देण्यात येईल, असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलं. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची किंवा गृहखातं वेगळं करण्याची गरज नसल्याचेही दानवे म्हणाले.

दरम्यान, कारखान्याची एफआरपी तपासून कमी असल्यास त्यांना एफआरपीचा दर द्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं.

VIDEO : पाहा दानवे काय म्हणाले?