Maharashtra Politics नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने (State Legislative Assembly Election 2024) भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. अशातच भाजपचा (BJP) आजपासून नागपुरात महाजनसंपर्क अभियान सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सामान्य नागपूरकरांच्या घरी जाऊन संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती मतदारांना देत भाजपसाठी पाठिंबा मागितला जात आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय हे पूर्व नागपूरमधील रामपेठ परिसरात लोकांच्या घरी जाऊन पाठिंबा मागत असल्याचे दिसून आले आहे.


अभियानातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची देणार माहिती


याच अभियानाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते मतदारयाद्यांमधील नावांची तपासणी ही करणार आहे. कोणाचे नाव मतदार यादीत आहेत? ते सध्या त्याच पत्त्यावर राहतात का? काहींचे मृत्यू झाले आहेत का? तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात काहींचे नाव मतदार यादीतून डिलीट करण्यात आले आहेत का? याचा आढावाही भाजप कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून घेतील.


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूरात विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये अमित शाह यांनी सी ग्रेडचे बूथ बी ग्रेड मध्ये आणि बी ग्रेडचे बूथ ए ग्रेड मध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने नागपुरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून संपर्क साधण्याचा अभियान सुरू केला आहे.


दिग्गज नेत्यांचाही सहभाग 


विधानसभेसाठी भाजप नागपूर पाठोपाठ राज्यात महाजनसंपर्क अभियान  राबवणार आहे. या माध्यमातून एकाच वेळी शहरातील सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडून घरोघरी जाऊन संपर्क साधतील. विशेष म्हणजे केंद्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ मंत्रीही यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत गृहसंपर्क साधतील. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यात सहभागी होणार आहेत. नागपूर नंतर विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर तसेच नंतर प्रचारादरम्यान राज्यात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपचे कार्य जनतेपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहचवणार आहे. राज्यात नागपुरातून या महाजनसंपर्क मोहिमेची आज सुरुवात झाली असून एकाच वेळी शहरातील सर्व सहा मतदारसंघातील 2 हजार 158 बूथच्या भागात भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन संपर्क साधतील, अशी माहिती पुढे आली आहे.


 हे ही वाचा