नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर सर्वसामान्य जनतेसाठी उद्यापासून मंदिरं खुली करा अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली असून महाराष्ट्रात सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय.  


 गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दुपारी नाशिकच्या प्रसिद्ध श्री नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावली आणि चक्क गाभाऱ्यातच जाऊन गणपती बाप्पाची विधिवत पूजाअर्चा करत आरती केली. आव्हाड यांचे कार्यकर्ते, मंदिर संस्थानचे अध्यक्षही त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते. मंदिराबाहेर पडताच आव्हाड यांचा मंदिर प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देत सत्कारही पार पडला. याबाबत मंदिर संस्थानला विचारणा केली असता 'दुपारच्या आरतीसाठी साहेब आले होते' अस त्यांनी म्हंटलय. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात सध्या प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय मात्र दुसरीकडे रविवारीच मंत्री महोदयांसाठी मंदिराची द्वारे उघडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय.  


कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसतांनाच सरकारकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलीय आणि या पार्श्वभूमीवरच शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी आणि ईतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीत कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करा, जे नागरिक किंवा व्यावसायिक कोरोना नियमांचे पालन करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना देत पर्यटनस्थळांवरही जमावबंदी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेत छगन भुजबळांच्या आदेशाला केराची टोपली दाखवलीय.        
     
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून धार्मिक स्थळे बंद आहेत, ती खुली करा अशी मागणी साधू, संत आणि विविध धार्मिक संघटनांकडून वारंवार केली जात असून सरकारकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाहीय तर दुसरीकडे आव्हाड यांनी थेट गाभाऱ्यातच जाऊन अशाप्रकारे दर्शन घेतल्याने या कृत्याचा भाजप अध्यात्मिक आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. जनतेला एक न्याय आणि मंत्र्याना दुसरा न्याय ही ठाकरे सरकारची भेदभावना अतिशय चूक असून जितेंद्र आव्हाड यांनी नियमाचं भंग केल्याने त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करा नाहीतर उद्यापासून सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी मंदिरे सुरु करा अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे.


एकंदरीतच बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह ईतर पक्षातील नेतेमंडळीच्या कार्यक्रमांना त्यांच्या बैठकांना गर्दी होतांना दिसून येते आहे, नाट्यगृहात नाटकांना बंदी घातली जाते मात्र लोकार्पण सोहळे दिमाखात तिथे पार पडतात, धार्मिक स्थळांवर सामान्य नागरिकांना दर्शनासाठी बंदी घातली जाते तर मंत्री महोदय मंदिरात मनोभावे पूजा करतात आणि हिच सर्व परिस्थिती बघता शासनाकडून लागू करण्यात आलेले कोरोनाचे नियम, अटी या फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहेत का ? मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन नेतेमंडळीच का करत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.