जळगाव/धुळे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्यांच्या खान्देशातील दौऱ्यात जळगाव आणि धुळ्यात प्रचंड गोंधळ उडाला.


जळगावात भाजपा रावेर लोकसभा क्षेत्रात कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात कधी घेणार कार्यकर्त्यांनी विषयावर दानवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तर धुळ्यात भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला असून सभेतच आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.

खान्देशच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांच्यासमोर जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी खडसेंना मंत्रिमंडळात घेण्याबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावर खुलासा करत खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांना नक्कीच स्थान दिले जाईल असे सांगून दानवे यांनी वेळ मारून नेली.

दुसरीकडे धुळ्यात भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. धुळे शहरातील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात भरसभेत गदारोळ झाला. यावेळी भाजप आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला आणि खुर्च्या फेकल्या. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, पर्यटन रोहयो मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. भाजप आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.