नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मी आणि स्वत: फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये केली होती. त्यावेळी यावर कुणीही आक्षेप का घेतला नाही, अशी विचारणा अमित शाह यांनी केली. मुख्यमंत्रीपदाबद्दलची मागणी नव्याने केली जात आहे. मात्र शिवसेनेकसडून केल्या जात असलेल्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.


उद्धव ठाकरे आणि माझ्यात बंद खोलीत झालेली चर्चा सार्वजनिक करणे योग्य नाही, ती भापची संस्कृती नाही. भाजपने शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही. उलट शिवसेनेने आमची साथ सोडली आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं. शिवसेनेनं मान्य न होणाऱ्या अटी आमच्यासमोर ठेवल्या आहेत. शिवसेनेची 50-50 ची अट चुकीची आहे. मात्र शिवसेनेसोबत काय फॉर्म्युला ठरला होता, हे मात्र अमित शाह यांनी सांगितलं नाही.


सध्या ज्यांच्याकडे 145 चा बहुमताचा आकडा असेल त्यांनी सत्ता स्थापन करावी. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, यावर विरोधक राजकारण करत आहेत. विधानसभेचा निकाल लागल्यानतंर राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी 18 दिवसांची वेळ दिली, मात्र सत्तास्थापनेसाठी एवढे दिवस कुठेही लागलेले नाही.  राज्यापालांनी सर्व मोठ्या पक्षांना सत्तास्थापन करण्याची संधी दिली होती. मात्र सर्वच पक्ष अपयशी झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. मात्र आता सर्वांकडे सहा महिन्याची मुदत आहे, तर त्यांनी सरकार स्थापन करावं, असा टोला अमित शाहांनी वेळ कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्यांना लगावला.