शाह यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे भाजपचीच खेळी आहे. महाशिवआघाडीचे हे सरकार अस्थिर सरकार असेल, केवळ तीन ते चार महिने हे सरकार असेल. पुन्हा भाजपचेच सरकार बसेल. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला सपोर्ट केल्यानं अल्पसंख्यांक समाज यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असेही ते म्हणाले.
आता 'जिसकी लाठी उसकी भैस' अशी स्थिती आहे. भाजपकडे सत्तेची पॉवर आहे. हा सगळा खेळ भाजपचाच आहे. 15 दिवसाच्या आत ही राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल, असेही शाह म्हणाले. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार अस्थिर असेल, हे सरकार केवळ तीन-चार महिन्यांचे असेल. त्यानंतर भाजपचेच सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. सत्तापॉवर भाजपकडे असल्यामुळे राज्यपालांनी देखील शिवसेनेला कमी वेळ दिला. भाजपला आम्ही कधीच पसंती दिलेली नाही. सरकार स्थापनेसाठी दोन मतांची गरज असेल त्यावेळीही आम्ही भाजपला मतं देणार नाही, आम्ही विरोधातच बसू, असेही ते म्हणाले.
राज्यात एमआयएमचे दोन आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. फारुख शाह यांनी धुळे विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार अनिल गोटे, महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांचा पराभव केला. आमदार डॉ. फारुख शाह यांनी या निवडणुकीत तीन हजार मताधिक्याने विजय मिळविला. सर्वप्रथम काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आमदार डॉ. शहा हे माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम संघटनेतर्फे नगरसेवक, नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उपमहापौर झाले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमतर्फे पहिल्यांदा नशीब अजमावले. त्यात त्यांनी बाजी मारली.