मुंबई : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही. तसंच फडणवीस सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी अमित शाह यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावाही शाह यांनी केला आहे.


'राज्य सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल'

अमित शाह म्हणाले की, ''राज्यातल्या भाजप सरकारचं काम चांगलं आहे. तसेच भाजपचे घटकपक्षांशीही संबंध चांगले असल्यामुळेच ते सरकारमध्ये सहभागी आहेत. तेव्हा राज्य सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल,'' असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

'कर्जमाफी करण्याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यावा'

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन, शेतकरी कर्जमाफी आदी प्रश्नांनाही अमित शाह यांनी सडेतोड उत्तरं दिली. मध्य प्रदेशमधील शेतकरी आंदोलनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना यश आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यायचा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

'राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी'

विशेष म्हणेज, राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.