नवी दिल्ली : महाराष्ट्रातलं शेतकरी आंदोलन यशस्वी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नजर आता दिल्लीकडे वळली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्यासह देशातल्या अनेक शेतकरी नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली.

राज्यापाठोपाठ देशातही संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन मागण्यांसाठी आता देशव्यापी आंदोलन उभं केलं जाणार आहे. 6 जुलै ते 2 ऑक्टोबर या काळात देशव्यापी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शेतकरी नेत्यांनी केली.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांवरच्या गोळीबारामुळे चर्चेत आलेल्या मध्यप्रदेशातल्या मंदसौर इथून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी बिहारच्या चंपानेर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यापासून केंद्र सरकार हात झटकू शकत नाही. कारण विषय राज्यांचा असला तरी सगळी धोरणं ही केंद्र सरकारच्याच हातात असल्यानं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबण्यात केंद्र सरकारच कारणीभूत आहे असा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला.

शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वामिनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करणं हे कुठल्याच सरकारला शक्य नसल्याचं जे विधान केलं होतं, त्याचाही शेट्टी यांनी यावेळी समाचार घेतला. ‘जर अमित शहा असं म्हणत असतील तर, त्यांनी प्रचारात भाजपनं दिलेली आश्वासनं खोटी होती. असं तरी आता जाहीर करुन टाकावं.’ असा टोला शेट्टींनी लगावला.

राजस्थानातले परिमल जाट, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, यूपीतले व्ही एम सिंह, कर्नाटकचे कुड्डियाळी चंद्रशेखर आणि आपल्या आंदोलनानं राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आलेले तामिळनाडूचे शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्जमाफीनंतर आता देशपातळीवरही कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा: राजू शेट्टी


शेतकरी संप देशस्तरावर नेणार: खा. राजू शेट्टी