मिरजेत भाजप आमदाराच्या शाळेची स्कूलबस खचलेल्या रस्त्यात अडकली
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2017 08:45 PM (IST)
NEXT PREV
सांगली : काल रात्री आणि पहाटे झालेल्या संततधार पावसामुळे सांगलीकर चांगलेच सुखावले आहेत. पण संततधार पावसाचा फटका मिरजेच्या आमदारांना बसला. पावसामुळे मिरजेचे भाजप आमदारांच्या शाळेची स्कूल बस रस्त्यात खचली. सध्या मिरज शहरातील दिंडीवेसकडून मालगावकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्णतः खचला आहे. या रस्त्यावरुन सकाळच्या सुमारास मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्कूलबस जात होती. यावेळी खचलेल्या रस्त्यात अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने यावेळी गाडीत विद्यार्थी नसल्याने मोठा अपघात टळला. पण रस्त्यात रुतलेली बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावी लागली. दरम्यान, मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. सध्या संपूर्ण शहर खड्डेमय झाले असून, शहरातील मध्यवर्ती भागातल्या रस्त्यांचा शोध घेण्याची गरज मिरजकरांना भासू लागली आहे. त्यातच मिरजेच्या आमदारांना याचा फटका बसल्याने, महापालिकेचे रस्त्याचे निकृष्ट काम समोर आले आहे. दुसरीकडे सांगली शहरात रस्त्यांची हिच दुरवस्था पाहायला मिळत आहे. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत.