Nilesh Rane : खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊत यांच्यामध्ये जर खरी हिम्मत असेल तर त्यांनी सांगावं, की कलानगरला राहणाऱ्या एका सम्राटाने घरातीलच कोंबडी कशी चोरली हे एकदा महाराष्ट्राला कळू दे, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. तो सम्राट कोण आहे, त्या बंगल्यात काय काय व्हायचं हे एकदा विनायक राऊत यांनी सांगावं, असेही निलेश राणे म्हणाले. 


जर विनायक राऊत बोलले नाहीत तर एक ना एक दिवस आम्ही महाराष्ट्राला सांगणार की कलानगरच्या सम्राटाने घरातलीच कोंबडी कशी चोरली, हे सांगायची आता वेळ आलीय आहे, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय.  विनायक राऊत यांनी औकातीत राहावं, नाहीतर या ठाकरेंची इज्जत, अब्रू रस्त्यावर आणण्यासाठी कारणीभूत विनायक राऊतच असतील, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला. 


अशोक चव्हाणांच्या प्रतिक्रियेवर काय म्हणाले निलेश राणे -
अशोक चव्हाण आत्ताच का बोलले हे मला समजत नाही, आता बोलायचं कारण काय?  आजपर्यंत आम्ही जे अशोक चव्हाण पाहिले ते पुराव्यानिशी कधीच बोलत नाहीत, हा हवेत गोळीबार आहे, त्यापलीकडे त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देण्याचं कारण नाही, आणि जर का असं असेल तर त्यांनी पुरावा द्यावा, असे निलेश राणे म्हणाले.  फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश असल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलेय. 


उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर काय म्हणाले? 
परवा जो गटप्रमुखांचा मेळावा झाला ते काय गटप्रमुख नव्हते, ते भारतनगर, खेरवाडी परिसरातल्या लोकांना पैसे देऊन तिकडे आणलं होतं. पाचशे रुपये, दोनशे रुपये देऊन इथून तिथून ही लोकं आणलेली होती, अनिल परब यांचं हेच काम  आहे. त्यामुळे शिवाजी पार्कला काही वेगळं होईल अशी अपेक्षा नाही, असे निलेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारणार, रडत बसणार, नेहमी त्यांनी रडण्याचंच काम केलं आणि अडीच वर्षे महाराष्ट्राला मागे टाकलं, असाही टोला त्यांनी लगावला. दसरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या हिताचं काही त्यांच्या तोंडातून निघेल अशी अपेक्षा ठेवू नका, असेही निलेश राणे म्हणाले.