Beed News Update : बीडमधील एका शेतकऱ्याची ( farmer) जमीन सावकाराने हडपल्या प्रकरणी माझ्या वडिलांना वाचवा म्हणून मुलीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहलंय. या पत्रातून मुलीने वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. 


बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा गावच्या शेखर सावंत या शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका खासगी सावकाराकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज परत केलं. मात्र कर्जापोटी गहाण ठेवलेली जमीन सावकाराने शेतकऱ्याच्या परस्पर आपल्या नावावर करून घेतली. हा प्रकार त्यांची मुलगी पूजा हिच्या लक्षात आल्यानंतर तिने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्याय मागितला आहे.


कुपा गावच्या शेखर सावंत यांची 24 वर्षांची मुलगी पूजा सावंत हिच्या लग्नासाठी ते स्थळ शोधत असतानाच गावातीलच खासगी सावकार गणेश मारुती वाघमारे याने शेखर सावंत यांच्या मुलीसाठी एक स्थळ आणलं. मात्र यावेळी लग्नाला मोठा खर्च होत असल्याने शेखर सावंत यांनी लग्न लांबणीवर टाकण्याचं ठरवलं. ही गोष्ट गणेश वाघमारे याला कळल्यानंतर त्याने सावंत यांना पूजा हिच्या लग्नासाठी आठ लाख 50 हजार रुपये उसने म्हणून दिले आणि लग्न जवळ येताच दिलेल्या पैशाचं व्याज द्या किंवा तुमची दोन एकर जमीन खरेदी खत करून द्या अशी अट शेखर सावंत यांना घातली. घरात शुभकार्य असल्याने त्यांनी ही विलंब न करता दोन एकर जमीन सावकार गणेश वाघमारे यांच्या नावे खरेदीखत करून दिली आणि आपल्या मुलीचं मोठ्या थाटात लग्न लावून दिलं. 


लग्न झाल्यानंतर शेखर सावंत यांनी गणेश वाघमारे यांना सर्व रक्कम परत केली आणि आपली जमीन परत मागितली. परंतु, वाघमारे यांनी जमीन देण्यास नाकार दिला. शिवाय पूजाच्या सासरच्या मंडळींनी देखील तिला माहेरी पाठवून दिलं. त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल  न्याय मिळावा म्हणून पूजा सावंत हिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे. या मुलीच्या पत्रामुळे बीड जिल्ह्यातील सावकारीने पुन्हा डोकं वर काढल्याचं बोललं जात आहे. 


महत्वाच्या बातम्या


Pankaja Munde: आत्ताचे युद्ध सोशल मीडियावरून; ट्रोलिंगवरून पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी 


मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकणार नाहीत; पंकजा मुंडेंचं वक्तव्य