Nilesh rane on Shiv Sena : भाजपा नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक, कोकणातील रिफायनरीचा मुद्दा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निवडणुकीवरून निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार प्रहार चढवला आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यावर देखील काही आरोप केले आहेत. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा आरोप - प्रत्यारोपांची रान उठताना दिसत आहे.


राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांच्या हालचाली यावर देखील निलेश राणे यांना एबीपी माझानं प्रश्न विचारले, त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. भाजपकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी मिळावी असे भीग मांगायचे धंदे संजय राऊत यांनी केले आहेत, अशा शब्दात त्यांनी राऊतांना लक्ष्य केले. तर, विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजप विजयी होईल. देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, 2024च्या निवडणुकीसाठी भाजपकडून तुम्ही लोकसभा लढवू इच्छिता का? यावर त्यांनी पक्षात शिस्त आहे. माझं म्हणणं मी पक्ष नेतृत्वाला कळवलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


रिफायनरी होणारच! 
रिफायनरीला समर्थन येत आहे. आता विरोध राहिला नाही. हे आम्ही पेट्रोलियम मंत्री यांना सांगितले आहे. सध्या चारही बाजूने रिफायनरीला समर्थन असेल तो सकारात्मक दिशेने जात आहे. केंद्रीय मंत्री सौदीच्या कंपनीसोबत बोलतील. पहिल्या एवढी रिफायनरी नाही झाली तरी रिफायनरी येईल. केंद्रीय मंत्री देखील याबाबत सकारात्मक असून ते सौदीच्या कंपनीसोबत बोलतील. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी चर्चा करावी. आम्ही त्याला तयार आहोत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आता नवीन पर्याय देखील सुचवावेत. रोजगाराच्या मुद्यावर सर्वांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. या प्रकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. 


'तिवरे धरण प्रश्नी कोर्टात जाणार'
तिवरे धरण फुटून 3 वर्षे झाली. यातील दोषींवर कारवाईबाबत अहवाल दिला गेला आहे. पण, अद्याप त्यामध्ये काहीही कारवाई झालेली नाही. तिवरेमधील ठेकेदार शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण देखील आहेत. या सर्व प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी वेळ पडल्यास मी कोर्टात जाईन अशी माहिती देखील यावेळी राणे यांनी दिली. तर, रत्नागिरी पोलिस वॉलफेअर फंडाचा वापर हा चुकीच्या पद्धतीनं होत आहे. याबाबतची सर्व माहिती मी सीबीआयच्या टीमला दिली आहे. माझं आणि पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांचं वैयक्तिक वाद नाही. पण, मग कोठडीतील आरोपी प्रदिप गर्ग याला स्पेशल ट्रिममेंट का दिली जाते? त्याला आपल्या कुटुंबियांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कसं काय बोलणं करू दिलं जातं? असा सवाल देखील यावेळी निलेश राणे यांनी केला आहे.