मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे .मात्र या यात्रेत नारायण राणे यांनी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचा युवा चेहरा असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेणं टाळलं आहे.


भाजपच्या नियोजनानुसार नारायण राणे उद्या दुपारी दीड वाजता वरळी मतदारसंघात भेट देणार होते. वरळी नाका येथील भिवंडीवाला चाळीत नारायण राणे यांची सभाही नियोजित केली होती. पण ऐनवेळी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या नव्या मार्गातून वरळी मतदारसंघ वगळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी ऐनवेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात जाणं का टाळलं? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.


यासंदर्भात जन आशीर्वाद यात्रेचे समन्वयक सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता वरळीत जाऊन परत येणे सोयीचे नव्हते. त्यामुळे हा बदल केला, असा दावा राणे यांनी केला. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार असल्यामुळे ही यात्रा चर्चेत आली. शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी स्मृती स्थळाला भेट देण्यास विरोध केला.
आणि आता नारायण राणे यांनी वरळी मतदार संघात जाणं आणि सभा घेणं टाळलं. यामुळे पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेची चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जाणं टाळण्यामागे पडद्याआड काही घडामोडी घडल्या का? याची चर्चा सुरू झाली आहे.


16 ऑगस्टपासून महाराष्ट्रात  भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली. नारायण राणे यांच्यावर मुंबईसह कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार पालघर जिल्हयातील आदिवासी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत. कपिल पाटील यांच्याकडे ठाणे, नवी मुंबईची जबाबदारी आहे. तर मराठवाड्यात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.


संबंधित बातम्या :


नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही : विनायक राऊत


जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार