मुंबई : विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत उमरखेडमध्ये 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशकातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास बंदी
अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कुठे कुठे आज कोणता अलर्ट :
- यलो अलर्ट : (15-64 मिमीपर्यंत पावसाची शक्यता)
कोकण : मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव
मराठवाडा : औरंगाबाद, जालना
विदर्भ : बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर
- ऑरेंज अलर्ट : (64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता)
विदर्भ - यवतमाळ (एक, दोन ठिकाणी अतिमुसळधार)
उद्या ‘या’ जिल्ह्यांना यलो अॅलर्ट
पालघर, नंदुरबार, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
भातलावणीसह शेतीच्या कामांना वेग
विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. अकोला, परभणी, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या. अकोल्यातल्या बहुतांश भागात पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. भंडाऱ्यातही पावसानं दमदार कमबॅक केलाय. त्यामुळे भातलावणीच्या कामांनी वेग धरलाय. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाय. यवतमाळ तालुक्यातही पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावला आहे.