सोलापूर : स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये, या शब्दात भाजप खासदार शरद बनसोडे यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. स्थानिक रस्ते विकास कामाच्या भाषणात प्रणितींनी बनसोडे बेवडे असल्याचा उल्लेख केला होता. 'मुंबईत काय काय चालतं, ते उघड करावं लागेल. सुशिलकुमार शिंदे यांचे रेल्वेतले किस्सेसुद्धा आम्हाला माहित आहेत. स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये. शेवटची वॉर्निंग प्रणिती ताई, वैयक्तिक टीका केलीत, तर तुमच्याही वैयक्तिक आयुष्यातले किस्से बाहेर काढले जातील.' असं प्रत्युत्तर सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांनी दिलं. निवडणुकीचे वेध लागताच राजकीय टीकाही जोर धरु लागली आहे. 'माफ करा, पण तुमचे खासदार बेवडे आहेत' अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी शरद बनसोडेंवर नाव न घेता निशाणा साधला. सरकारच्या घरपोच दारु पोहचवण्याच्या निर्णयाच्या चर्चेवरही त्यांनी सडकून टीका केली. याच भाषणात त्यांच्या कचाट्यातून सहकारमंत्री सुभाष देशमुखही सुटले नाहीत. सुभाष देशमुखांच्या आरक्षित जागेवरील बंगल्यावरुन प्रणिती शिंदेंनी देशमुखांना लाज-शरम नसल्याचं वक्तव्य केलं. रस्ते विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?'आत्ता तुम्ही पेपरमध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री, यांचं एकच काम आहे, एकमेकांशी भांडणं करा, त्यांचे गट सांभाळा, पेपरमध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटनं करा. म्हणजे आयत्या बिळात नागोबा. एवढंच यांचं काम आहे. हे स्वतः एक दमडी पण आणू शकले नाहीत सोलापूरमध्ये. किती? दोन मंत्री. एक बेवडा खासदार. माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात. पण आज महिला आहेत. पण दुसरं काय बोलणार? वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल. तुम्हाला माहित आहे का पेपरमध्ये काय आलं? इकडे महिला हैराण आहेत. मोदी सरकारने घोषणा केली आम्ही दारु घरपोच देणार. अरे बाबा, इकडे रेशन घरपोच मिळत नाहीये. इथे लोक मरत आहेत. तुम्ही जेवण घरपोच देत नाही, पण दारु देताय? म्हणजे काय चाललंय?'