धुळे : धुळ्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून तरुणी बचावली आहे. मात्र या कुटुंबाने टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


रेल्वेखाली उडी मारुन तिघांनी आत्महत्या केली, तर त्यांच्यासोबत असलेल्या 36 वर्षीय महिलेने 16 वर्षीय मुलीसह रेल्वे रुळाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एकाच कुटुंबातील एकूण चौघांचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय मुलगी वाचली आहे.

सूरत-भुसावळ रेल्वे मार्गावर नरडाणापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास भुसावळहून सूरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली चिरडून तिघांचा मृत्यू झाला.

35 वर्षीय पिंटू आसाराम भील, 28 वर्षीय शिवदास भील आणि 18 वर्षीय मोठाभाऊ भील यांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू झाला. 36 वर्षीय विठाबाई पिंटु भील यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. 16 वर्षांची मुलगी अक्काबाई बचावली आहे. हे सर्व जण मूळचे अमळनेर तालुक्यातील बाम्हणे गावचे राहणारे असून हल्ली शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथे राहत होते.