मुंबई: दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात एक भलेमोठे लोखंडी होर्डिंग कोसळले (Hoarding collapse) होते. हे होर्डिंग शेजारच्या पेट्रोलपंपावर कोसळले होते. त्यामुळे पेट्रोल पंपावरील अनेक लोक होर्डिंगखाली दबले होते. या दुर्घटनेला आता 45 तास उलटल्यानंतरही याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. हे बचावकार्य अंतिम टप्प्यात असून आता मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पोकलेन आणि गॅस कटरचा वापर केला जात आहे. गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करुन ते क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले जात आहे. यादरम्यान बचाव पथकांना होर्डिंगखाली दबलेली गाडी नजरेस पडली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, होर्डिंगच्या एका लोखंडी गर्डरच्या खाली लाल रंगाची गाडी अडकून पडली आहे. लोखंडी होर्डिंगच्या प्रचंड वजनामुळे ही गाडी पूर्णपणे चेपली आहे. या गाडीत एक महिला आणि पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. गाडीची अवस्था आणि 45 तासांचा कालावधी लक्षात घेता संबंधित महिला आणि पुरुष वाचण्याची शक्यता फार कमी आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी नेमके किती लोक अडकून पडले आहेत, याबद्दल प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. काहीजण या होर्डिंगखाली अद्याप 35 ते 40 जण अडकून पडले असावेत, असा अंदाज व्यक्त करत आहेत. तसे झाल्यास मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 


दरम्यान, या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने या परिसरातील अशाचप्रकारची होर्डिंग उतरावयाला सुरुवात केली आहे. ही होर्डिंग्ज लवकरात लवकर उतरवली जातील. जेणेकरुन पावसाळ्याच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, असा पालिकेचा प्रयत्न आहे.


इंधनाचा साठा आणि सीएनजी हटवल्यानंतर मोहिमेला वेग


घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळले होते, ते एका पेट्रोल पंपावर कोसळले होते. होर्डिंगचा प्रचंड लोखंडी ढिगारा पाहून याठिकाणी तात्काळ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) जवानांना पाचारण करण्यात आले होते. एनडीआरएफने याठिकाणी बचावकार्य सुरु केल्यानंतर त्यांना लोखंडी गर्डर कापून लोकांना बाहेर काढायचे होते. मात्र, पेट्रोल पंपावर मोठ्याप्रमाणवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा साठा असल्याने गॅस कटर वापरता येत नव्हते. अखेर बुधवारी सकाळी या पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा करण्यात आला. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी गॅस कटरने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करायला सुरुवात केली आहे. हे तुकडे क्रेनच्या साहाय्याने बाजूला ठेवून लोखंडी ढिगारा कमी केला जात आहे. 


आणखी वाचा


होर्डिंग कोसळण्याआधी 10 मिनिटे कामावर आला अन् घात झाला; सचिनचा तो थरकाप उडवणारा शेवटचा क्षण