मुंबई : नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या चर्चगेटमधील प्रेमकोर्ट या निवासस्थानी ही भेट झाली. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभेत आज ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.


तासाभराच्या चर्चेनंतर खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवारांच्या घरातून निघाले. परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर अजित पवार म्हणाले की, " आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी शत्रू नाही. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. ते सहज भेटायला आले होते. ते भाजपमध्येच आहेत. मी राष्ट्रवादीतच आहे. गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. ते कालच भेटणार होते. त्यामुळे ते आज सकाळी मला भेटायला आले. अनेक पक्षांचे नेते मला भेटतात. विश्वासदर्शक ठरावासाठी कोणी कोणाला भेटत नाही. बहुमत चाचणीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे बारामतीकरांना दिसणार आहे, अजित पवारांनी कोणाला मत दिलं आहे. राष्ट्रवादी पक्ष जी जबाबदारी देईल ती करणार."

दरम्यान, चिखलीकरांच्या भेटीनंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. सिल्वर ओक इथे जाणाऱ्या एका गाडीत भाजपचे नेते बबनराव पाचपुते असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासोबतच जयंत पाटील हे देखील शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

आज बहुमत चाचणी
महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (30 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडीच्या सरकारला आजच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आज दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल. त्यानंतर ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ जातं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

संबंधित बातम्या


नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परीक्षा, विधानसभेत आज बहुमत चाचणी


उपमुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, अजित पवार म्हणतात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच