मुंबईः भाजप विरुद्ध शिवसेनेचा वाद आता टोकाला पोहोचल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाने बदनामीकारक वृत्त छापल्यामुळे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी हायकोर्टात बदनामीची याचिका दाखल केली आहे. सामनाचे प्रकाशक, संपादक आणि मालक यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांनी एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.


 

सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांच्याविरोधातही बदनामीचा खटला दाखल केला आहे. बदनामीकारक वृत्त छापल्याप्रकरणी सामना वृत्तपत्राला जाहीर माफीची मागणी केली होती. मात्र माफी न मागितल्यामुळे सोमय्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

https://twitter.com/KiritSomaiya/status/741243140019871744

 

काय आहे प्रकरण?

सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्याबाबतचे वृत्त सामना दैनिकाने छापले होते. सोमय्या यांनी त्यांच्या पत्नीमार्फत झोपडपट्टी विकास प्राधिकरण लाटल्याचा मुख्य आरोप इनामदार यांनी केला होता. मात्र सामनाने कसलीही पडताळणी न करता हे वृत्त जाणीवपूर्वक छापले आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

 

या प्रकरणी सोमय्यांनी सामनाला जाहिर माफी मागण्याची विनंती केली होती. पण सामनाने माफी न मागितल्यामुळे सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

 

सामनाचे संपादक खासदार संजय राऊत, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली आहे. इनामदार यांनी केलेल्या आरोपांची कसलीही पडताळणी न करता बातमी केल्यामुळे आपली बदनामी झाली आहे. त्यामुळे आपण बदनामीची याचिका दाखल करत असल्याचं सोमय्यांनी ट्विट केलं आहे.